मुंबई (प्रतिनिधी) : पूर्ण राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. शहरात सखल भागांत पाणी साचले आहे. एकीकडे सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आल आहे. मुंबईच्या समुद्रात सध्या ४.४७ मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत.

गुजरातमध्ये गेल्या २४  तासांत पाऊस आणि पुरामुळे ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे १०  हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल आहे. ८ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातही मुसळधार पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून  ७५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीत पूरस्थितीमुळे अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, शिराळा तालुक्यातील मांगले-सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे, तर दुसरीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी १८ फूट झाली आहे.

मागील आठवड्यापासून राज्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने आगामी चार दिवस पुन्हा नाशिक, पुणे, पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे. राज्यात सलग चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सरासरीपेक्षा ३८०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, म्हणजे सरासरीच्या १९ टक्के अधिक पडला आहे.

पुणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे धरणसाठ्यामध्ये वाढ झाली असून, नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने दारणा व गोदावरी नदीला पूर आला आहे. विदर्भात नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, पुणे, मालेगाव, माथेरान, कोल्हापूर या शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला.