कोल्हापूर : सांगली लोकसभेच्या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. विशाल पाटील एकाकी झुंज देत असताना आता सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षाचा दबाव जुगारून विशाल पाटलांना पाठींबा देत प्रचारात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली असून राज्याच्या राजकारणात नव्या मिरज पॅटर्नची चर्चा चांगलीच रंगली आहे. याबबात राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना यावर भाष्य केलं आहे.

राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आज कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या मिरज पॅटर्नवर बोलताना त्यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचं मान्य केलं. पुढे बोलताना ते म्हणाले, विशाल पाटील हे अनेक दिवसांपासून तयारी करत आहेत. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला. आघाडीत ही जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे आम्ही आघाडी धर्म पाळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी आम्ही काम करत आहेत, असे ते म्हणाले.

राज्यात मिरज पॅटर्नची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन नवा पायंडा पडून सांगली लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील यांना बळ दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा हा मिरज पॅटर्न ठरेल. तर सर्व नगरसेवकांनी एकत्र येत विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक असणारे नगरसेवकही या पॅटर्नमध्ये सहभागी झाले आहेत. भाजप पक्षाच्याही अनेक नगरसेवकांनी ही संजय काका पाटील यांना विरोध करत विशाल पाटील यांचा प्रचार करत आहेत. पक्षाच्या कारवाईला न जुमानता विशाल पाटील यांचा प्रचार करणार असल्याची ठाम भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे आता भाजप, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.