मुरगूड (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने अखेर हसूर बुद्रुक ते बोळावी या वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मिटला आहे. वन विभागाने हा रस्ता खडीकरणासह, रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक मंत्री मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे यांच्याकडे दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कागल तालुक्यासह गडहिंग्लज, भुदरगड आणि आजरा या तालुक्यातील वाहतुकीच्यादृष्टीने हसूर बुद्रुक, बोळावी, ठाणेवाडी, अवचितवाडी, चिमगाव ते मुरगूडपर्यंत हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. भुदरगड तालुक्यातील पांगिरे पाटीपासून सुरू झालेला हा रस्ता पुढे मुरगूडला संपतो. दरम्यान, हसूर-बुद्रुक ते बोळावी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांपैकी साधारणत: एक किमी लांबीचा रस्ता वनविभागाच्या हद्दीत आहे. वन विभागाच्या कायद्यामुळे हा रस्ता करता येत नव्हता. प्रत्यक्षात रस्ता असतानाही त्यावर खडीकरण किंवा डांबरीकरण करण्यासाठी कायद्याने बंदी होती.
खडी उखडल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे अनेक अपघात होत होते. अनेक वेळा ग्रामस्थ आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष सुद्धा झाले आहेत. वनविभागाच्या उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेशिवाय हा रस्ता करता येत नव्हता. पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या पाठपुराव्याने अखेर वन विभागाने हा रस्ता खडीकरणासह, रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यास परवानगी दिली आहे.