मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरासाठी राजकीय नेते कोलांड उड्या मारत आहेत. यावरुन अनेक कायदे तज्ज्ञांनी चिंता ही व्यक्त केली आहे. जून 2022 मध्ये शिवसेना पक्ष फूटला, त्यापाठोपाठ जून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. पक्ष कोणाचा यावरुन राजकीय गटांनी न्यायालयाची, निवडणूक आयोगाची दारे ही ठोठावली आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं. निवडणूक आयोगाने असाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घेतला आहे. यावरुन आता पुन्हा आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. नुकतंच राष्ट्रवादीच्या निकालानुसार राष्ट्रवादी पक्ष तसेच चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाचे असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील कार्यालयाबाहेर चिन्ह तुम्हारा बाप हमारा अशा आशयाचे फलक आता झळकू लागले आहेत.

त्यामुळे या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वातावरण गढूळ बनलं असून, आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात येत आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, निवडणूक आयोगाने चोरांची चोरी वैध ठरवायला सुरुवात केली आहे. अशा निर्णयांमुळे लोकशाही नष्ट होते.