कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पंचगंगा स्मशानभूमीत बसवण्यात येणारी गॅस दाहिनीची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने नियमानुसार देशातील विविध राज्यात इंग्रजी दैनिकांत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र ही जाहिरात गुवाहाटीच्या पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्याने पुन्हा एकदा कोल्हापुरात गुवाहाटीची चर्चा खमंगपणे सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पंचगंगा स्मशानभूमीत 1 कोटी 58 लाख 723 रूपयांची गॅस दाहिनी बसवणार आहे. याची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने राष्ट्रीय पातळीवर टेंडरची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

जाहिरात गुवाहाटीसह दिल्ली, कोलकात्ता, हैदराबाद, चेन्नई, गुजरात, महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे. मात्र सोशल मीडियात गुवाहाटीतील जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ देऊन काय झाडी काय डोंगार काय हाटील हे डायलॉग यानिमित्ताने कोल्हापुरात घूमू लागले आहेत.