मुंबई (प्रतिनिधी) : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी एखाद्याचा वाढदिवस, परीक्षेचा निकाल किंवा एखादी आनंदाची बातमी असेल तर आपण व्हॉट्सॲपच्या ‘स्टेटस’वर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करतो आणि या खास गोष्टी इतरांपर्यंत पोहचतात. मात्र, तो व्हिडिओ 30 सेंकदात व्हायचा. पण, आता कंपनीने स्टेटस या फीचरसाठी अपडेट जारी केला आहे.

कंपनीने इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर एका नवीन फीचरची सध्या चाचणी करत आहेत. हे नवीन अपडेट ‘स्टेटस’ (Status) या फीचरसाठी असणार आहे. फोटो स्टेटसला ठेवण्यात काही चिंता नसते, पण व्हिडीओ शेअर करायचा असल्यास त्याचे लहान लहान पार्ट करून पोस्ट करावे लागतात. पण, आता युजर्सना चिंता करण्याची गरज नाही.

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना आता एक मिनिटांचे व्हिडीओ स्टेटसवर अपलोड करण्याची परवानगी देणार आहे. वापरकर्त्यांना याआधी फक्त ३० सेकंदाचे व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगी होती. त्यामुळे पूर्ण व्हिडीओ स्टेटसला अपलोड करता येत नाही, अशी तक्रार वारंवार ग्राहकांकडून येत होती.

तर हीच बाब लक्षात घेता व्हॉट्सॲप युजर्ससाठी हा अपडेट लवकरच आणणार आहे आणि युजर्सना एक मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ अपलोड करता येणार आहे.