कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेची सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व अन्य सभासदांच्या सहकार्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली.

कर्मचारी पत संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असल्यामुळे अनावश्यक निवडणूक खर्च टाळावा या उद्देशाने गेली 15 वर्ष कर्मचारी पत संस्थेची निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम राखत यावेळी ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.

सहकाराच्या माध्यमातून व कर्मचारी सभासदांच्या वाजवी गरजा नियमांच्या अधीन राहून पूर्ण करता आल्या पाहिजेत, सभासदांचे हिताचे निर्णय घेता आले पाहिजेत, या उद्देशाने कर्मचारी पत संस्था गेली 46 वर्षाहून अधिक काळ पत संस्था अग्रेसर आहे.

140 कोटींचा वार्षिक उलाढाल असणारी नेट एनपीए सातत्याने 0 टक्के ठेवणारी, सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळवणारी तसेच सभासदांना 13% लाभांश तसेच सर्व आधुनिक सुविधा कर्मचाऱ्यांना देणारी कर्मचारी पतसंस्था अशी या पतसंस्थेची ख्याती आहे.