जालना (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार चालवतात, तर हे सरकार भगवान चालवते. राज्यातील सरकार राम भरोसे आहे. या सरकारला जागे करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. सरकारने जालन्याला एक रुपयाही दिला नाही. मविआ सरकार पाणी प्रश्नासाठी गंभीर नाही. या सरकारने पाणी योजनांची हत्या केली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वाखाली जालन्यात काढण्यात आलेल्या भाजपच्या जलआक्रोश मोर्चात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे सरकार हे टक्केवारी आणि वसुलीत खूश आहे. जनतेच्या प्रश्नाचे सरकारला देणे घेणे नाही. मराठवाड्याची कवचकुंडले या सरकारने मारून टाकली. जनतेच्या समस्या सोडवणार नसाल, तर तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यात आहे. पैठणच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात पंधरा दिवस पाणी येत नाही. सरकारला जागे करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, मविआ सरकारमुळे अनेक कामे रखडली आहेत. पाणीप्रश्नासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही. आमच्या सरकारने १२९  कोटी रुपये पाणी योजनेसाठी पैसै दिले; मात्र अडीच वर्षांत ही योजना पुढे गेली नाही. हे सरकार केवळ चालू कामे बंद करण्याचे काम करते आहे. १५७ टीएमसी पाणी समुद्रात जाऊ न देता ते गोदावरी खोऱ्यात आणण्याचा प्रयत्न मविआ सरकारने हाणून पाडला. जलयुक्त शिवार योजना ठाकरे सरकारने बंद केली. हे सरकार सगळ्या योजना बंद करते आहे. वैधानिक विकास महामंडळ बंद केले आणि मराठवाड्यावर अन्याय केला; मात्र मंत्र्यांनी ब्र शब्द काढला नाही. मराठवाड्यातील मंत्रीही केवळ पैसा कमविण्यात व्यस्त आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, जनतेच्या प्रश्नाचे ठाकरे सरकारला काही देणे घेणे नाही. त्यांना गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंहासन दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून जनतेसाठी काही काम झाले नाही. ३५  हजार कोटी मोदी सरकारने पाणी समस्या सोडविण्यासाठी दिले; मात्र राज्य सरकारकडून ५००  कोटी रुपये देखील खर्च होऊ शकले नाहीत. जालन्याला रोज पाणी मिळणार नाही, तोपर्यंत ठाकरे सरकारला आम्ही झोपू देणार नाही. सरकारमुळे मराठवाड्यातील जनतेच्या पाणी योजना रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.