कोल्हापूर (प्रतिनिधी) ; बाल कामगार शोध मोहीमेत आढळून आलेल्या ३३ बालकांना पश्चिम बंगाल आणि ओडीसा राज्यातील त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. तसेच या बालकांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी तिकिटे उपलब्ध होत नसताना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून राखीव कोट्यातून तिकीट उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे या बालकांना आपापल्या गावी जलदगतीने पाठविणे शक्य झाल्याचे सांगितले.

शिल्पा पाटील म्हणाल्या की,  जिल्हा बाल कामगार विरोधी कृतीदलाने जिल्ह्यात बालकामगार शोध मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या होत्या. यानुसार प्रियदर्शनी पॉलीसॅक्स व महालक्ष्मी पॅकिंग, शिरोली येथे टाकण्यात आलेल्या धाडीत १२३ बाल कामगार आढळून आले होते. बाल कल्याण समितीने बालकांचे प्रत्यक्ष अवलोकन करुन सर्वसाधारण १८ वरील ६४ बालकांना वयाची निश्चिती करुन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.

तर उर्वरीत ५९ बालकांचे वय १८ वर्षाच्या आतील असण्याची शक्यता गृहित धरून त्यांना तात्पुरत्या निवारणासाठी बालगृहात दाखल केले होते. या ५९ बालकांचे शासकीय वैद्यकीय सेवेमार्फत वय निश्चित करण्यात आल्यानंतर १६ बालकांचे वय १८ वर्ष पूर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांना कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. तर १० बालकांना वयाचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यामध्ये २३ बालके पश्चिम मेदनापूर (पश्चिम बंगाल), ८ पूर्व मेदनापूर (पश्चिम बंगाल) आणि २ बालकांना ओरिसा राज्यातील बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आल्याचे शिल्पा पाटील यांनी सांगितले.

यासाठी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, बाल कल्याण समितीचे सदस्य शिल्पा सुतार, अश्विनी खाडे, पद्मजा गारे, संजय मुंगळे, भिमराव कांबळे, अवधूत घाटगे आदींचे सहकार्य लाभले.