कोल्हापूर (प्रतिनिधी ) – डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालय क्रीडा स्पर्धेत डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजने 106 गुण संपादन करून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

डॉ. मुदगल यांच्या अध्यक्षतेखली बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. शिक्षणासोबत शारीरिक व मानसिक विकासही महत्वाचा आहे. क्रीडा स्पर्धामुळे सांघिक भावना वाढीस लागून शारीरिक तंदुरुस्तीही राखता येते असे सांगत डॉ. मुदगल यांनी सर्व विजेते व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले यांनी प्रास्ताविकमध्ये म्हणाले, स्पोर्ट्स आणि फिजिकल एज्युकेशनच्या माध्यमातून चालू शैक्षणिक वर्षात स्पर्धेत आठ संस्थेतील 977 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल,कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ अथलेटिक्स खेळाचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या तिन्ही सांघिक प्रकारात डी वाय पाटील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा संघ विजेता ठरला. स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सची पल्लवी यादव आणि मेडिकल कॉलेजचा अनमोल बगरिया यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.

सर्वसाधारण विजेतेपद मिळवणाऱ्या डी वाय पाटील नर्सिंग कॉलेज तर्फे प्रभारी प्राचार्य जानकी शिंदे आणि सर्व खेळाडूंनी कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते अजिंक्य पदाचा फिरता चषक स्वीकारला. यावेळी विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडू व संघांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी परीक्षा नियंत्रक अभय जोशी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.

कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.