मुंबई (प्रतिनिधी) आजपासून गणेश उत्सावाला सुरुवात झाली आहे. लाडक्या गणरायाचा जयघोष संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. राज्याची राजधानी मुंबईत देखील गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईमध्ये हर्षोल्हासात सर्वत्र गणरायाचे मोरयाच्या जयघोषात आगमन झाले.

बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी तब्बल १० ते १५ किलोमीटर दूरपर्यंत रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. आज पहाटेपासून भविकांनी गर्दी केली आहे. दुसरीकडे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक फुलांची अरास करण्यात आली आहे.

मुंबईचा राजा गणेशगल्ली : गणेशगल्लीच्या गणपतीची मुंबईचा राजा अशी ख्याती आहे. मुंबईच्या राजाने यंदा काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. मुंबईचा राजा यंदा विश्वकर्मा रुपात पाहायला मिळतोय. यंदा या गणपतीच्या मूर्तीची उंची तब्बल २२ फूट इतकी आहे.

लालबागचा राजा : नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्त रांगा लावतात. लालबागचा राजा ज्या ठिकाणी विराजमान होतो त्याच ठिकाणी बाप्पाची मूर्ती साकारली जाते. लालबागच्या राजाचे यंदाचे ८९ वे वर्ष आहे.

जीएसबी गणपती : माटुंग्यातील जीएसबी सेवा गणेश मंडळाला मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाते. या मंडळाने यंदा गणेशमूर्ती मंडप आणि इतर साहित्याचा तब्बल ३००कोटींचा विमा उतरवलाय. जीएसबीच्या गणेशमूर्तीला ६८ किलो सोने आणि ३२७ किलो चांदीने सजवण्यात आले आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी : चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा प्रसिद्ध असतो. बाप्पाच्या आगमनाच्या दोन महिने आधीपासूनच त्याची तयारी सुरू होते.

तेजुकाय मेन्शन गणपती : लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर गणेशभक्त तेजुकाय मेन्शन गणपतीचे दर्शन घ्यायला जातात. तेजुकाय गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव असते. त्यामुळे ही गणेशमूर्ती अनेकांसाठी आकर्षण ठरते.