मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून राज्य सरकारने कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून राज्यभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचे मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज (रविवार) दिली.

मंत्री मलिक म्हणाले की, सरकार आपल्या तिजोरीतून लसीकरण करणार आहे. त्यासाठी जागतिक टेंडर मागवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. कॅबिनेट बैठकीत लसीच्या दराबाबत चर्चा झाली. यावर एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वय वर्ष ४५ खालील लोकांना केंद्र लस पुरवठा करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपयाला मिळणार आहे. कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना ६०० रुपये व खासगी विक्रीसाठी १२०० रुपये, अशी जाहीर केली आहे.