कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील हिंमतबहादूर परिसरातील वैशाली अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बंबाच्या साहाय्याने ही आग वेळीच आटोक्यात आणली.

याबाबतची अधिक माहिती अशी, वैशाली अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहुल सुलताने राहतात. आज दुपारच्या सुमारास त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये त्यांच्या फ्लॅटमधील फ्रीज, मायक्रोओव्हन भांडी, कपडे, टीव्ही तसेच अन्य प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या आगीबाबतची माहिती काही नागरिकांनी कावळा नाका येथील अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर तत्काळ दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे नवनाथ साबळे, आकाश जाधव, माणिक कुंभार व जवानांनी ही आग वेळीच आटोक्यात आणली.