कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनलॉक ५ च्या पार्श्वभूमीवर आज (५ ऑक्टोबर) पासून सरकारने राज्यात बार आणि हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सुमारे ६ ते ७ महिने बंद असलेली हॉटेल्स आणि बार आता पुन्हा एकदा व्यवसायासाठी खुली होणार आहेत. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

याआधी सरकारच्या नियमानुसार हॉटेल्समध्ये फक्त पार्सल देण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे आता ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स आणि बार व्यवसाय सुरू होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास १ हजार हॉटेल्स आणि ६०० च्या आसपास बिअर बार आहेत. यामध्ये १५ ते २० हजार कामगार काम करतात. शिवाय या हॉटेल्सवर भाजीविक्रेते, मसालाविक्रेते, चपाती करणारे त्याचबरोबर अनेक बारीक-सारीक साहित्य पुरवठा करणारे अनेकजण अवलंबून आहेत. या व्यतिरिक्त जवळपास २५ टक्के अप्रत्यक्ष लाभ घेणारे जसे की किराणामाल विक्रेते, पानपट्टी, रिक्षाचालक हे व्यवसाय सुद्धा यावर अवलंबून आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल्स आणि बारशी संबंधित सर्वच व्यवसायांना चालना मिळणार आहे. शिवाय आज हॉटेल्स सुरू झाल्यामुळे जवळपास १० हजारांवर कामगार हजर होणार आहेत. जरी आजपासून हे व्यवसाय सुरू होत असले, तरी सुरूवातीला महापुरामुळे आणि आता कोरोनामुळे डबघाईला आलेल्या या व्यवसायांना पूर्ववत होण्यासाठी पुढील ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागेल, असे हॉटेल चालक मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर आणि बिअर बार संघाचे अध्यक्ष बाबा निंबाळकर यांनी सांगितले.