सातारा/ प्रतिनिधी : महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरून जो तिढा होता तो आता सुतला आहे. सातारची जागा भाजपला तर नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. त्यामळे उदयनराजे हेच भाजपचे सातारा लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. तसेच उदयनराजे भोसले यांचा राज्यसभेचा दोन वर्षाचा कार्यकाळ असेल त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता राज्यसभेवर जाईल या अटीवर ही जागा भाजपला सोडण्यात आली आहे.

सातारा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीची होती. ती जागा आता भाजपला देण्यात आली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीनं भाजपला जागा सोडली आहे त्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या राहिलेल्या कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्यात येणार आहे. उदयनराजे भोसले राज्यसभेवर आहेत. त्यांचा 2026 पर्यंत कार्यकाळ आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या जागी राष्ट्रवादीचा सदस्य 2 वर्षासाठी राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा कर्जतला मेळावा पार पडला होता. कर्जतच्या मेळाव्यात अजित पवार यांनी सातारा, बारामती, शिरुर आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून साताऱ्यातून नितीन पाटील यांचं नाव चर्चेत होतं. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी देऊ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरुन लढण्यास नकार दिला होता. अखेर उदयनराजे भोसले यांचा भाजपकडून लोकसभा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोण असणार हे स्पष्ट झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून साताऱ्याच्या जागेसाठी श्रीनिवास पाटील, सुनील माने, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. थोड्याच वेळात याबाबत अंतिम उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते.