गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी परिसरात असलेल्या शिंदेवाडी गावामध्ये भाऊबंदकीच्या वादातून काल (बुधवार) रात्री मारामारी झाली. यामध्ये  काठी, कुऱ्हाड, फावडे आणि खुरप्याचा सर्रास वापर झाला. दोन महिलांसह पाचजण जखमी झाले असून भुदरगड पोलिसांत परस्परांविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दोन्ही बाजूच्या दहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत फिर्याद भगवान नामदेव पाळेकर (वय ४५, रा. शिंदेवाडी) यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. शेजारी राहणाऱ्या रामचंद्र ज्ञानदेव पाळेकर यांच्यात घराशेजारील बोळावरून वाद आहे. रामचंद्र पाळेकर यांनी तिथे असणाऱ्या कुत्र्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी भगवान याने याचा जाब विचारल्यानंतर आरोपी रामचंद्र पाळेकर, सौ. लता रामचंद्र पाळेकर, कृष्णा ज्ञानदेव पाळेकर, वैभवी कृष्णा पाळेकर, नीता दत्तात्रय घेवडे, विश्वजीत दत्तात्रय घेवडे यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही देत फावडे उचलून डोक्यात मारले.

यात भगवान पाळेकर, भावजय सुनीता सागर पाळेकर, सागर नामदेव पाळेकर हे जखमी झाले आहेत. याबाबत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर रामचंद्र ज्ञानदेव पाळेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी दारात उभे असतांना शेजारी राहणारे सागर नामदेव पाळेकर, सुनीता सागर पाळेकर, भगवान नामदेव पाळेकर,बेबीताई नामदेव पाळेकर यांतील सागर याने जीवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालण्याचा प्रयत्न केला. तो घाव वैभवी हिच्या पायाला लागल्यामुळे ती जखमी झाली आहे. तिच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. याबाबत वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.