कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ प्राणीशास्त्र विभाग सेंटर ऑफ इंक्युबेशन इन सेरिकल्चर आणि नाबार्ड बँक भारत सरकार यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती पाहणी दौरा कर्नाटक राज्यामध्ये दि. १४ ते १६ सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हैसूर तसेच म्हैसूर विद्यापीठ रेशीम संशोधन केंद्र आणि कर्नाटक राज्यातील बाजारपेठ, चॉकी संगोपन केंद्र, प्रगतशील शेतकऱ्यांच्या भेटी तसेच इतर शास्त्रज्ञ संशोधन अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांचा संवाद ठेवण्यात आला आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, हातकणंगले, करवीर अशा विविध तालुक्यातील निवडक रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये रेशीम शेतीमध्ये काम करणारे पती-पत्नी यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.

या दौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हा रेशीम अधिकारी डॉ. भगवान खंडागळे तसेच प्राणीशास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद आणि सहकार्य मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याला शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विभागप्रमुख आशीष देशमुख, रेशीमशास्त्र समन्वयक डॉ. अधिकराव जाधव तसेच विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी अजित चौगुले, उपकुलसचिव रमेश लिधडे आणि जिल्हा रेशीम अधिकारी डॉ. भगवान खंडागळे, नाबार्डचे जिल्हाप्रमुख आशुतोष जाधव व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत या अभ्यास दौऱ्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.