नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने याबाबत दिलेला तडजोडीचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे. सरकारने दिलेला प्रस्ताव मान्य नसल्याने नवा प्रस्ताव येईपर्यंत देशभरात आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी आज (बुधवार) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिला.

नेत्यांनी सांगितले की, सरकारने नव्या प्रस्तावात पुन्हा तेच मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. त्यामुळे यापुढील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. १२ डिसेंबरपासून राजस्थान हायवे, दिल्ली बॉर्डर जाम करणार असून १४ डिसेंबर रोजी सर्व सीमांवर सर्व आंदोलक लाक्षणिक उपोषण करणार, १४ डिसेंबरला देशातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन काढण्यात येईल. प्रत्येक शेतकऱ्याने रिलायन्स जिओ सीम वापरण्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.