कुरुंदवाड(प्रतिनिधी): कुरुंदवाड नगरपालिका सभागृहाची मुदत संपल्याने पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. नगराध्यक्ष जयराम पाटील व नगरसेवकांनी ५ वर्षाच्या काळात शहराचा पुरेपूर विकास साधण्याचा प्रयत्न केला. यासाठी सर्वांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे सांगत आभार मानले. बहुतांश नगरसेवकांनी पालिकेत पुन्हा येईनचा नारा यावेळी दिला.

नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कार्यकाळ बुधवारी समाप्त झाला. अखेरचा दिवस असल्याने नगरसेवक,पती-पुत्रांनी पालिकेत हजेरी लावली होती. काही नगरसेवक व प्रशासनातील काही कर्मचारी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. मात्र,सर्व मतभेद बाजूला ठेवून पेढ्यांची देवाणघेवाण करत पुष्पगुच्छ देण्यात आले.

यावेळी पालिकेत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. नगरसेवकांची मुदत संपल्याने नगरसेवक आणि पदाधिकार्यां च्या अधिकारावर मर्यादा आल्या आहेत. निवडणूक कधी लागेल आणि नवे सभागृह कधी अस्तित्वात येईल हे निश्चित नाही. त्यामुळे पुढील काळात माजी नगरसेवकांना प्रशासकासोबत जुळवून घ्यावे लागणार आहे. तर शहरातील पायाभूत सुविधा, नागरिकांचे प्रश्न नगरसेवकांविना तडीस लावण्याचे दिव्य प्रशासकाला पार पाडावे लागणार आहे. अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारांनी सभागृहात उपस्थित राहून नगराध्यक्ष, नगरसेवकांना त्यांच्या कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या.