कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या महाद्वारापासून ते तटाकडील तालीम चौकापर्यंत निरंतर ४४ वर्षे सेवा देणार्‍या झाडू कामगार पौर्णिमा प्रकाश कांबळे यांच्या निवृत्तीबद्दल सर्व सहकारी कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांना एका छोटेखानी समारंभात हृदय निरोप देण्यात आला.

२२ वर्षे रोजंदारीवर आणि पुढील २० वर्षे कायम सेवेत राहिलेल्या पौर्णिमा कांबळे यांनी आपल्या सेवेतील बहुतांश काळ हा करवीर निवासिनी मंदिरापासून ताराबाई रोडची झाडलोट करण्यात व्यतीत केला. त्यांच्या सेवेबाबत नागरीकही नेहमी कौतुकाने बोलताना दिसत होते. त्यांच्या निवृत्तीनिमित्त आज (बुधवार) सहकारी सर्व महिला कर्मचारी आणि मुकादम यांनी त्यांचा घरगुती स्वरूपात सत्कार केला.

त्यावेळी त्यांची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. आणि त्यांच्या पतीना भाजपाचे शिवाजी पेठ मंडल सरचटणीस राहुल पाटील यांच्या हस्ते पेहराव करण्यात आला. यावेळी बोलताना नगरसेवक आणि भाजपाचे गटनेते अजित ठाणेकर यांनी पौर्णिमा कांबळे यांच्या प्रदीर्घ आणि चांगल्या सेवेचे कौतुक करून त्यांना दिर्घायुरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना कांबळे या भावविवश झाल्या. आपल्या कामाचे श्रेय सर्व सहकार्‍यांना देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सर्वांनी समजून घेतले म्हणून काम चांगले झाले, अशा पध्दतीने नागरीकांचेही आभार मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन मुकादम सिकंदर बनगे, लता पोवार, वनिता चोपडे यांनी केले होते. कार्यक्रमास प्रकाश कांबळे, विजया कांबळे, लता कांबळे, दया कांबळे शिवाय कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.