नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या ‘दलबदलू’ प्रतिमेसाठी विख्यात, मात्र तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली अभिनेत्री खुशबू सुंदर हिने काँग्रेसला रामराम करीत हाती ‘कमळ’ घेतले आहे. आज (सोमवार) त्यांनी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.
खुशबू या हिशेबी राजकारणासाठी पटाईत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा पक्षांतर केले आहे. २०१० साली त्यांनी डीएमकेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षप्रवक्ते पदावरून हटविण्यात आल्याने काँग्रेस पक्षनेत्यांवर त्या संतापल्या होत्या. पक्षात वरिष्ठ पदावर बसलेले काही जण आणि ज्यांना जनतेशी काहीही संबंध नाही, असे नेते हुकूमशाही करू पाहात आहेत. मात्र पक्षावर निष्ठा असलेल्या माझ्यासारख्या लोकांना बाजूला केले जात आहे, अशा भावना त्यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केल्या होत्या.
खुशबू या तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. आठ महिन्यानंतर तामिळनाडूमध्ये निवडणुका होणार आहेत. राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभावदेखील मर्यादित स्वरुपाचा आहे. भाजपमध्ये सध्या राज्यात वजन असलेला कोणताही नेता नाही. त्यामुळे खुशबू यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला फायदा होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.