कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोनाबाधित रूग्णांचे हाल होत आहेत. यासंबंधी वारंवार सूचना देवूनही दखल घेत नसाल तर तुमची सर्व प्रकरणे, भानगडी बाहेर काढावी लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिला.

राजू शेट्टी यांनी मित्तल यांना रेमडेसिव्हर इंजेक्सनच्या टंचाईसंबंधी माहिती घेण्यासाठी संपर्क साधत होते. ते त्यांचा मोबाईल घेत नसल्याने मेसेज केला होता. तरीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी शेट्टी यांनी मित्तल यांच्या मोबाईलवर मी काही कोणत्या औषधांच्या खरेदीसाठी फोन करीत नाही, गरीबांसाठी फोन करीत आहे, असा मेसेज टाकला. हा मेसेज वाचून मित्तल यांनी शेट्टी यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी मित्तल यांच्या कारभाराचा चांगलाच पंचनामा केला. तुमच्या औषध खरेदीच्या भानगडी काढण्यास भाग पाडू नका, असा दमही दिला.

दरम्यान, कोरोना औषध घोटाळा राज्यात गाजत आहे. पुरवठादार, कंत्राटदारांचे फोन मित्तल घेतात. मात्र, सामान्य कोरोनाबाधित रूग्णांना औषध मिळण्यासाठी पाठपुराव्यासाठी फोन केल्यानंतर ते माझा फोन घेत नाहीत, असेही शेट्टी यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले.