कोल्हापूर (प्रतिनिधी) : मास्क नाही, प्रवेश नाही, मास्क नाही, वस्तूही नाही, हा उपक्रम महापालिका प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबवत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अधिक गतीमान केला आहे. याची काटेकोर अंमलबजावणीसाठी महापालिकेने ३० पथके तैनात केली आहेत. शहराच्या विविध भागात मास्क न वापरणाऱ्या तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत, अशी माहिती महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे यांनी दिली.

त्या म्हणाल्या,  नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे आणि गर्दीत न जाणे हे नियम कटाक्षाने पाळाव्यात. शहरातील भाजी, फळ विक्रेते तसेच दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांनी स्वत: मास्क व हॅण्डग्लोज वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही मास्क असल्याशिवाय आणि सामाजिक अंतराचे पालन केल्याशिवाय वस्तू देऊ नयेत.