कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाचताना नीट वाचा. ‘ध’ चा ‘मा’ करु नका असा उपरोधिक सल्ला वाचकांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवारी) कोल्हापुरात दिला. दरम्यान, ‘मी सांगतोय ना’ असे म्हणत चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांवर भडकले.

त्याचे असे झाले की, आज कोल्हापुरात पुण्याच्या धर्तीवर फिरत्या वाचनालयाच्या गाडीचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, पुस्तक वाचल्याशिवाय ज्ञानात भर पडत नाही. त्यामुळे पुस्तक वाचणे महत्त्वाचे आहे. मात्र पुस्तक वाचताना नीट वाचा. काही कळाले नाही तर एका नव्हे दोनदा वाचा, चिंतन करा, मनन करा नाहीतर म्हणाताना एक म्हणतो आणि अर्थ मात्र वेगळाच काढला जातो, असे होऊ देऊ नका. ‘ध’ चा ‘मा’ करु नका, असा उपरोधिक सल्लाही यावेळी वाचकांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.  महापुरुषांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदा मंत्री पाटील यांनी उपरोधिक हे भाष्य केले.

दरम्यान, काही कार्यकर्ते चंद्रकांत पाटलांचा सत्कार करत होते. दिवसभर अनेक कार्यक्रम असल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे चंद्रकांत पाटलांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी जायचे असल्याने मंत्री पाटील हे घाई करत होते. काही कार्यकर्ते हारतुरे घेऊन येऊ लागले. चंद्रकांत पाटील म्हणाले, आता सत्कार कार्यक्रम नको. मला खूप कार्यक्रम आहेत. तरीही एक उत्साही कार्यकर्ता सत्कारासाठी गळ घालू लागला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी चिडून ‘मी सांगतोय ना’ असे सुनावल्यानंतर कार्यकर्ता शांत झाला. त्यानंतर मंत्री पाटील यांनी दसरा चौकात फिरत्या वाचनालयाचे उद्घाटन केले आणि प्रचारासाठी निघून गेले.