कोल्हापूर (प्रतिनिधी) : पीएम किसान सन्मान निधी योजनेतून आपल्याला अपात्र करण्यात यावे, या मागणीचे पत्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना दिले आहे.

पीएम किसान योजनेतून दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता ३१ मे रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खात्यात जमा झाला. ते लोकसभेचे माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी त्यांच्या खात्यावर जमा होत आहे. याआधी ६ हप्ते जमा झाल्यानंतर त्यांनी १२ हजार रुपयांचा धनादेश शासनास परत केला होता. या योजनेतून त्यांना अपात्र करण्याबाबत त्यांनी पत्र दिले होते.

तरीही आजअखेर ११ हप्ते नियमित जमा झालेले आहेत. शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना भेटून या योजनेतून अपात्र करण्याबाबत सांगितले. तरीही त्यांच्या खात्यावर पैसे यायचे थांबले नाही; पण सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अनेक हेलपाटे घातले तरी सुध्दा त्यांचे पैसे येत नाहीत, ही बाब माजी खासदार राजू शेट्टी यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास दिली.