मुंबई ( वृत्तसंस्था ) एका पोलिस ठाण्यातून किंवा जिल्ह्यातून दुसरीकडे बदली झाल्यास, संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निरोप देताना कौतुक सोहळा आयोजित केला जातो. खाकी गणवेशावर रंगीत फेटे बांधणे, पुष्पवर्षाव, किंवा या अधिकाऱ्याला सरकारी वाहनात बसवून ते वाहन दोऱ्या बांधून ओढण्याचे प्रकार केले जातात.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या अशा प्रकारांची पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली असून, बदल्यांनंतरचे असे सोहळे बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

हे प्रकार पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यपद्धतीला अनुसरून नसल्याचे स्पष्ट करत, बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे निरोप सोहळे टाळण्याचे आदेश पोलिस महासंचालक शुक्ला यांनी राज्यातील पोलिसांना दिले आहेत.

अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम होणार नाही याची दक्षता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे. त्याचबरोबर असे सोहळे कोणी आयोजित केल्याचे आढळल्यास, संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.