कोल्हापूर (प्रतिनिधी) : पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत’ महोत्सव २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणार आहे. या महोत्सवाची पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली कणेरी मठ येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सिद्धगिरी मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी, विश्वस्त उदय सावंत व संतोष पाटील, समन्वय अधिकारी अमेय हेटे, कार्यक्रम व्यवस्थापक प्रसाद महाडकर व संदीप वेंगुर्लेकर, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, पंचमहाभूत महोत्सवाला राज्यासह देशभरातून लाखो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा महोत्सव उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाचे चोख नियोजन करुन नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाव्यात. हा पंचमहाभूत महोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने चोख नियोजन करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पाच पंचमहाभूतांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी पंचभौतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साधारण ५०० एकर जागेमध्ये होणाऱ्या या उत्सवामध्ये जगभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर व सुमारे ३० लाख नागरिक उपस्थित राहतील. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या महोत्सवाचे स्वरुप असेल. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्यांतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, विविध विद्यापीठांचे कुलगुरु, उद्योगपती, आसपासच्या राज्यातील विद्यार्थी, शेतकरी देखील या महोत्सवात सहभागी होणार आहेत. देशी गाई, म्हशी, श्वान, पशुपक्षी यांचे महत्त्व विषद करणारे प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात येतील. शेतीला उपयुक्त सुमारे ३०० यंत्रांचे प्रदर्शन या ठिकाणी असेल. महोत्सवात सहभागी सुमारे ३० हजार नागरिकांच्या राहण्याची सोय सध्या करण्यात आली आहे, असे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. विश्वस्त उदय सामंत व संतोष पाटील यांनी महोत्सवाची सादरीकरणातून माहिती दिली.