पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्तिकी वारीमध्ये “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” हे ब्रीद वाक्य घेऊन तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शिबिराला भेट दिली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, तीन दिवसीय महाआरोग्य शिबिर पंढरपूर येथील 65 एकर परिसरामध्ये दि. 22 ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित केले असून यात असंख्य भाविक व नागरिक आपल्या आरोग्याची तपासणी करून घेत आहेत. बुधवारी या शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.