गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे कागल आगारातून सुटणारी कागल-रंकाळा बस फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे केएमटी बसमधून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ने-आण होत आहे. परंतु कागलमधून किंवा कणेरी फाट्यावरून जाणाऱ्या बसेस फुल्ल होऊन येत असल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

गोकुळ शिरगाव औद्योगिक परिसर असल्यामुळे गोकुळ शिरगाव, सुदर्शन, मयूर बसथांब्यावर नागरिकांसह शेकडो विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत उभे असतात. कागलकडून येणारी केएमटी बस गोकुळ शिरगाव थांब्यावर थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना विनाकारण दोन- दोन तास थांब्यावर ताटकळत उभारावे लागते. या बस थांब्यावर बसण्यासाठी स्टँड नसल्याने विद्यार्थी दुकानामध्ये थांबतात.

प्रवाशांच्या मोठ्या गर्दीमुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात तरी केएमटी बसच्या जादा फेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.