कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील अतिक्रमणाबाबत वारंवार बैठकीत विषय होऊनही प्रशासनाकडून कारवाई होत नाही. अतिक्रमणाबाबत प्रशासनाची दिरंगाई होत असल्याने काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ते आज (शुक्रवार) स्थायी समितीच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी देशमुख यांनी, हॉकी स्टेडियम, आरक्षित जागेमध्ये आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला टपऱ्या, केबीन, टॅम्पो उभे करुन व्यवसाय सुरु आहे. तेथील शहरातील गाळे धारकांनी टॅक्स, लायसन्स फी भरुन व्यवसाय करीत आहेत. परंतू हे रस्त्याकडेला कोणताही परवाना न घेता कोणतीही फि न भरता व्यवसाय करत आहेत. मग हा नियम सर्वांनाच लागू करा. असा प्रश्न उपस्थित करत देशमुख यांनी, जो टॅक्स भरतो. त्याच्यापेक्षा जास्त व्यवसाय या लोकांचा होत असल्याचे सांगितले. यावर महापालिकेच्या परिसरात कारवाई केली असून याच्या पुढील कारवाईचे नियोजन पालिका प्रशासन करीत असल्याचे सांगण्यात आले.

तसेच अॅस्टर आधामध्ये गर्दी होत होती, त्यामुळे हॉस्पीटमध्ये एका नातेवाईका व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांना जेवण्यासाठी, बसण्यासाठी आणि बाथरुमची व्यवस्था असावी यासाठी उद्यान विकसीत करण्याच्या अटीवर दोन ते तीन वर्षासाठी एकच जागा दिलेली आहे. परंतू सध्या हे हॉस्पीटल तीन जागेचा वापर करीत आहे. हे गार्डन आणि इतर जागा सर्वांसाठी खुल्या करा, अशी मागणी गटनेते शारगंधर देशमुख यांनी केली.

यावर अॅस्टर आधार हॉस्पीटल समोरील जागा बगीचा आणि एसटीपी प्लॅन्ट करणेसाठी भाडेतत्वावर दिलेली आहे. इतर आजूबाजूची कोणतीही जागा भाडे तत्वावर दिलेली नाही. बाजूची जागा त्यांनी मागणी केलेली आहे. हे गार्डन सर्वांसाठी खुले ठेवावयाचे आहे. याची उद्या पाहणी करुन पुढील कारवाई करु, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.