कोल्हापूर  (प्रतिनिधी) : महापालिका,  जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदच्या सहकार्यातून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टने सायबर महाविद्यालयातील बॉईज हॉस्टेलमध्ये सुरू केलेल्या मोफत कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

डॉ. बलकवडे  म्हणाल्या की, गतवर्षी प्रमाणे याही वर्षी रूग्णांच्यावर चांगले उपचार होतील. या केंद्राची ऑक्सिजन,  इलेक्ट्रीकल आणि फायर ऑडीट झाले आहे. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांना लसीकरण केले आहे. या केंद्रात उपचार घेतल्यानंतर रूग्ण १०० टक्के बरे होऊन आपल्या आप्तजनांमध्ये घरी परतावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे,  उपायुक्त निखील मोरे,  शास्त्रज्ञ धनेश बोरा, डॉ. ऋतुजा मोहिते,  उपशहर अभियंता बाबुराव दबडे,  पोलीस अमर नाईक उपस्थित होते.

प्रथमच रोबोचा वापर

सायबर पोलीस ठाण्याचे अजय सावंत व जिनय गाडा यांच्या संकल्पनेतून रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. या रोबोच्या माध्यमातून केंद्रातील कोरोना रूग्णांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे. त्याशिवाय पल्स ऑक्सीमीटर, गोळ्या, सॅनिटायझर याबाबतची सेवाही देता येणार आहे. प्रथमच अशा रोबोचा वापर कोविड काळजी केंद्रात होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी दिली.