कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला असून संचारबंदी लागू असताना शासन नियमांचे उल्लंघन करून परवानगी न घेता लोक एकत्र जमवून निदर्शने केल्याप्रकरणी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील, आर.के.पोवार, प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या सह १८ जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कडक लाँकडाऊन असून संचारबंदी लागू आहे. यामध्ये आज खत दरवाढ विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोणतेही शासकीय परवानगी न घेता कार्यकर्ते एकत्र जमवून कोल्हापुरात निदर्शने करण्यात आलीत. त्यामुळे शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील, आर.के.पोवार, भैय्या माने यांच्यासह सुनील देसाई, आदिल फरास, अनिल साळुंखे, महेश चव्हाण, युवराज वारके, किसनराव कल्याणकर, रियाज कागदी, प्रसाद उगवे, संजय पडवळे, रमेश पोवार, संजय कुराडे, रामराजे बदाले, सुहास साळुंखे, जयकुमार शिंदे, सुनील जाधव अशा १८ जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.