कळे  (प्रतिनिधी ) :  बाजार भोगाव ( ता.पन्हाळा ) परिसरात दोन ठिकाणी छापा टाकून बेकायदा दारूविक्री करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून ३०  हजार ९९२  रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई कळे पोलिसांनी केली.

बाजार भोगाव ते पडसाळी रस्त्यावरील काऊरवाडी गावच्या हद्दीत असलेल्या पृथ्वीराज बिअर शॉपीलगत ही कारवाई केली. याठिकाणी कोलिक पैकी चाफेवाडी (ता.पन्हाळा)  येथील लक्ष्मण कोंडीबा पानकर (वय २२) याला उघड्यावर बेकायदा दारूविक्री करत असताना पकडले. त्याच्याजवळ ९८० रुपये किंमतीच्या वीस सीलबंद बाटल्या सापडल्या.

फुलेवाडी (कोल्हापूर) येथील दोघेजण प्रोव्ही गुन्ह्याचा माल दुचाकीवरून वाहतूक करत होते. दरम्यान, ते बाजार भोगाव एस.टी. स्टँडजवळ संकेत चायनीज सेंटरसमोर आल्यावर पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ४ हजार ९९२ रुपये किंमतीच्या ९६ दारूच्या बाटल्या व २५  हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण २९  हजार ९९२  रूपयांचा  मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी फुलेवाडी येथील प्रसाद जनार्दन काशीद (वय २८) व संदेश महादेव पाटील (वय ३९,  मूळ गाव नणुंद्रे,  ता. पन्हाळा) यांच्या विरोधात कॉन्स्टेबल सुरेश पांडुरंग पोवार यांनी फिर्याद दिली.