नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरू लागला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविडचे 529 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी 2 कर्नाटकात आणि 1 गुजरातमध्ये नोंदवला गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोविड-19 सक्रिय रुग्णांची संख्या 4093 वर पोहोचली आहे.

कर्नाटकात JN.1 प्रकाराची 34 प्रकरणे

कोरोना JN.1 चे नवीन प्रकार कर्नाटकात वेगाने पसरत आहे. राज्यात आतापर्यंत याची लागण झालेले ३४ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी दावा केला आहे की सरकार सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे आणि काहीही धोकादायक नाही. ते म्हणाले, ‘राज्यात कोरोनाचे 430 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 400 होम आयसोलेशनमध्ये असून उर्वरित रुग्णालयात दाखल आहेत.

7-8 रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत, गोष्टी ठीक आहेत. आतापर्यंत सापडलेल्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. JN.1 ची 34 नवीन प्रकरणे आहेत. आम्ही चांगली तयारी केली आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. बंगळुरूमध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. मी लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करतो.