मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारने आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने  या निर्णयाला विरोध केला. तर आज (मंगळवार) केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिला आहे. याबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविण्यात आले आहे.

कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्क अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे ही जागा ‘एमएमआरडीए’ला देण्याचा निर्णय रद्द करा, त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबावा, असं या पत्रात म्हटले आहे. या पत्रावरून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. मात्र शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.

मुंबईचा विकास कसा रोखायचा यासाठी केंद्रातील सरकार नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाचे काम थांबविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केली आहे. कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपाकडून कटकारस्थान सुरू आहे,  असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

मात्र खा. संजय राऊत म्हणाले की, हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतील. कायम केंद्र सरकारवर तोफ डागणाऱ्या राऊत यांनी यावर सावध भूमिका घेत प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घेतल्याचं बोललं जात आहे.