कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीने मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याविरोधात वेळोवेळी केलेल्या तक्रारी मागे घेतल्याचा अर्ज कृती समिती अध्यक्ष अर्शद बागवान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला आहे.

आतापर्यंत दिलेल्या सर्व तक्रारी गैरसमजूतीतून तसेच भावनेच्या भरात केल्या असल्याचे कृति समिती अध्यक्षांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. या सर्व तक्रारी स्वखुषीने मागे घेत असून, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आलेला नाही. कुरुंदवाड नगरपरिषद प्रशासन यांच्याविरुध्द केलेले आजपर्यंतचे सर्व तक्रारी मागे घेत असल्याचे या अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे कृती समिती व पालिका प्रशासन यांच्यातील वादावर पडदा पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याविरोधात कृती समितीने गेल्या दोन वर्षांपासून माहिती अधिकारातून विविध  माहिती मागवून जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. शिवाय वारंवार आंदोलन केले जात होते. त्यामुळे आजपर्यंतच्या सर्वच तक्रारी मागे घेत असल्याचे लेखी पत्र समिती अध्यक्ष अर्शद बागवान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.