कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यात ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. साखराळे गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली. यामुळे काही काळासाठी मतदान केंद्रावर तनाव निर्माण झाला होत. तसेच काही वेळासाठी मतदान थांबवण्यात आले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झालं.

मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरुडकर यांचे बोगस प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने केंद्र काही काळ बंद ठेवले होते. यावरून सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जाब विचारण्यासाठी आले. दोन्ही गटांत शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली.

हातकणंगले मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केलं. बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने ही आतापर्यंत निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदार संघात माने घराण्याचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. तत्पूर्वी, 2009 ते 2019 पर्यंत या मतदारसंघाचे राजू शेट्टी यांनी नेतृत्व केले.