मुंबई (प्रतिनिधी) : येथील आरेमधील मेट्रो कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हटवली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडवरील बंदी हटवल्यानंतर आता आरेतील मेट्रो कारशेडच्या कामासाठी जोरदार सरकारी हालचाली सुरू झाल्या आहेत.

आरेमध्ये कारशेड करण्याबाबत देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१९ मध्ये निर्णय झाला होता; पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी आरे कारशेडवर स्थगिती आणली होती. आता राज्यात पुन्हा नव्याने शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मेट्रो-३ चे कारशेड हे आरेमध्येच होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडवरील बंदी उठवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर आता पुन्हा मुंबईकर आणि पर्यायवरणवाद्यांकडून विरोध होत आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईकर, पर्यावरणवाद्यांनी मेट्रो कारशेडला विरोध करत कारशेड हे इतरत्र ठिकाणी तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेने सत्तेत राहून या निर्णयाला विरोध केला होता. त्यांनी मेट्रो कारशेड दुसरीकडे करण्यात यावे, अशी मागणी केली होती. हा वाद अजूनही सुरु असताना आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे.