ठाणे (प्रतिनिधी) : कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखे बोलत आहेत. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटलेला असताना महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाही आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला.

दिवसेंदिवस महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळत आहे. महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले.

ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ‘सध्या महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटलेला असताना महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखे बोलत आहेत. काल त्यांनी कहर केला. पण आमचे मुख्यमंत्री त्यांना जेवढे लिहून दिले जाते तेवढेच ते वाचतात.’

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्र-कर्नाटक वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. पण महाराष्ट्र जसा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहतोय, तशी वाट कर्नाटकानेही बघणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना ते जर बेळगावला उपराजधानीचा दर्जा देत आहेत. हे सगळे डोक्यावर पाणी गेल्यासारखे झाले आहे. आता तर त्यांनी आणखी काही गावांवर आपला हक्क सांगितला आहे. महाराष्ट्राला कोण वाली आहे की नाही”, असे म्हणत त्यांनी सवालही उपस्थित केला.

केंद्रात, कर्नाटकात, महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे. महाराष्ट्रात मिंदेंचे सरकार असले तरी ते भाजपाचेच आहेत. एकेकाळी आपल्या मिंदेंचा नेता बाळासाहेब होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. पण कर्नाटक बोम्मई यांचा नेता मोदी असताना ते जोरात बोलतात, तर आमचा मुख्यमंत्री का नाही बोलत”, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.