पंढरपूर प्रतिनिधी

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दि.14 ते दि.16 जानेवारी 2023 या कालावधीत मकर संक्रांत उत्सव साजरा होत आहे. या उत्सव कालावधीत महिला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, महिला भाविकांना श्री.रूक्मिणीमातेस भोगी करण्यासाठी भोगीच्या दिवशी (शनिवार, दि.14जानेवारी 2023 रोजी) श्री. रूक्मिणीमातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 3.00 ते 4.00 या वेळेत करण्यात येत असल्याची माहिती मंदीर समितीचे  सहअध्यक्ष  गहिनीनाथ महाराज औसेकर व अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.

श्री.रूक्मिणीमातेस भोगीच्या दिवशी पहाटे 4.00 ते 5.30 या वेळेत महिला भाविकांना भोगी करता येईल. त्यादिवशी पहाटे 5.30 नंतर श्री. रूक्मिणीमातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व तद्नंतर सकाळी 6.15 वाजता पदस्पर्शदर्शन सुरू करणेत येईल, तसेच भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दि.16 जानेवारी 2023 रोजी श्री. विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 4.30 ते 5.45 या वेळेत करण्यात येत असल्याने पदस्पर्श दर्शन पहाटे 5.45 वाजता सुरू करण्यात येणार आहे.

दि.15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीनिमित्त जास्तीत जास्त महिला भाविकांना श्री. विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आलेआहे.