कुरुंदवाड (प्रतिनिधी) : देशभरातील सहकारी सूतगिरण्या व वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकारी तत्त्वावरील अनेक संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑप. स्पिनिंग मिल्स, मुंबई या संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची बिनविरोध निवड झाली.

या संस्थेवर अनेक वर्षे सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांचे वर्चस्व होते. संस्थेच्या उपाध्यक्षपदी कर्नाटक स्टेट को-ऑप. स्पिनिंग मिल्स फेडरेशनचे चेअरमन एस. एस. दोडमणी यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी अड ए. जी. पंडित होते.

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, आपण राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून यापुढेही सर्वांना सोबत घेऊन काम करत राहू व अडचणीत असलेल्या सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्यांना पुन्हा ऊर्जितावस्था कशी येईल, यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे.

सभेस चेअरमन कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सूतगिरणीचे चेअरमन संजय पाटील-यड्रावकर, टाकवडे येथील राजर्षी शाहू यंत्रमाग संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील-टाकवडेकर, कार्यकारी संचालक एस. जे. सिक्वेरा, आण्णा भाऊ साठे आजरा तालुका शेतकरी सूतगिरणीचे चेअरमन अशोक चराटी, शेतकरी सहकारी टेक्स्टाईल, यड्रावचे चेअरमन अजित उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.