राधानगरी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक कोविड सेंटरवर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नेमणूका केलेल्या आहेत. त्या नेमणूका त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाअधिकारी यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा शिक्षकेत्तर संघाचे ज्येष्ठ सदस्य एम. एन. पाटील (नरतवडेकर) यांनी केली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रशासनाने जून आणि ऑगस्ट महिन्यात कोविड सेंटरवरील केलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. पण सप्टेंबर महिन्यात पुन्हा नेमणूकीचे आदेश दिले आहेत. त्या रद्द व्हाव्यात. कारण या कर्मचाऱ्यांना शाळेमध्ये, ऑनलाइन शिक्षण, पोषण आहार वाटप, पुस्तके वाटप, अलगीकरण शाळा निर्जंतुकीकरण करणे, शाळा साफसफाई ही कामे आहेतच. त्यातच कोविड सेंटरवर त्यांना कोणत्याही कामाचा अनुभव नाही. ड्युटीवरुन आल्यानंतर त्यांना ८ दिवस विलगीकरण व्हावे लागते. त्यामुळे त्यांच्या नेमणूका रद्द झाल्या पाहिजेत. यावेळी जिल्हा सचिव चंद्रकांत लाड, सचिन पाटील, सागर कुपले उपस्थित होते.