कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मराठा आरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया अनेक वर्षे चालणारी आहे. त्यामुळे लवकर आरक्षण मिळवण्यासाठी लोकसभा हाच योग्य मार्ग आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार म्हणून लोकसभेत हा मुद्दा रेकॉर्डवर आणावा अशी मागणी ठोक मोर्चा समितीच्या नेत्यांना खा. संजय मंडलिक यांच्याकडे केली.

खा. संजय मंडलीक यांनी, लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा रेकॉर्डवर आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.

येथील शासकीय विश्रामधामावर झालेल्या चर्चेत प्रा. जयंत पाटील यांनी खा. संभाजीराजेंच्या मागण्या वेगळ्या आहेत. तर आमच्या मागण्या वेगळ्या आहेत. आपण १०२ व्या घटना दुरुस्तीबाबत परस्पर प्रयत्न करावेत, असे सांगितले. अॅड. बाबा इंदुलकर यांनी, आरक्षण कसे मिळवून देणार यावर राज्यकर्ते कोणीच काही बोलत नाहीत. म्हणूनच आमचा रस्त्यावरील ठोक मोर्चा आहे. सुप्रीम कोर्टात किती वर्षे लागतील हे सांगता येत नाही. म्हणून राज्यातील सर्व आमदार, खासदार यांनी लोकसभे आणि राज्यसभेच्या अध्यक्षांसह पंतप्रधानांना याबाबत पत्र पाठवून हा प्रश्न लोकसभेच्या रेकॉर्डवर आणावा. ओबीसीमधूनच आपल्याला आरक्षण मिळवावे लागणार आहे. आणि ते टिकणारे आरक्षण मिळू शकते.

दिलीप देसाई यांनी, येणाऱ्या अधिवेशनात आपण काय भूमिका घेणार हे स्पष्ट करावे, अशी विचारणा केली. निवासराव साळोखे यांनी, संभाजीराजे यांनी राज्यशासनाला एकवीस दिवसांचा अल्टीमेटम् दिला आहे. तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाही. तरीही आमचे आंदोलन ठोकमोर्चाचेच असेल, असे प्रतिपादन केले. महेश जाधव यांनी, राज्यातील सर्व आमदार, खासदारांनी मराठा आरक्षणासाठी पक्षविरहीत राहून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी सुजित चव्हाण, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, अशोकराव भंडारे आदी उपस्थित होते.