मुंबई (प्रतिनिधी) : तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केले. दारूची दुकानेही सुरू आहेत. पण मंदिरे उघडत नाही. अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही तर कुणाला आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. मंदिरे न उघडणे हा मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहून मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे सुनावलं आहे. यावर पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, माणसाला जशी भुकेची गरज असते, तशीच मन:शांतीचीही गरज असते. भारतातील लोक पूजा-अर्चा करतात म्हणून देशातील आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे मंदिरे उघडण्याची गरज आहे. तुम्ही सत्तेच्या गादीवर बसला आहात. स्वा. सावरकरांवर काँग्रेसने टीका केली, तेव्हा तुम्ही गप्प बसलात. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज आहे. मग मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे आहे ? त्यांना नेमकं काय करायचे आहे ? कोरोना हा मंदिरात दबा भरून बसला आहे का ? मंदिरात गेलेल्या माणसावरच कोरोना हल्ला करतो का ? विमानातून, एसटी आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.