नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्याबद्दल तक्रार केली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर केलेली पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांनी ती पोस्ट काढून टाकण्याची मागणी यावेळी केली आहे.

यासोबतच राहुल गांधींनी सत्ता आणि ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्याबाबतही भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, त्यांनी (राहुल गांधी) हिंदू श्रद्धा, लोकांच्या धार्मिक भावना आणि महिला शक्तीचा अपमान केला आहे.

ईव्हीएमबाबत दिलेल्या वक्तव्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, नुकत्याच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. राजकीय पक्ष निवडणुका जिंकतात किंवा हरतात. जेव्हा ते निवडणुका जिंकतात तेव्हा त्यांच्यासाठी ईव्हीएम चांगले असते आणि ते हरतात तेव्हा ते ईव्हीएमला दोष देतात, यामुळे राजकारणाचा दर्जा खालावतो आणि त्यांची निराशा दिसून येते.