गारगोटी (प्रतिनिधी) : जंगल परिसरातील देवकेवाडी (ता. भुदरगड) येथे गावठी दारू अड्ड्यावर भुदरगड पोलिसांनी आज (रविवार) दुपारी धाड टाकली. या धाडीत दारू बनवणारे रसायन, प्लास्टिक टाक्या, मोटारसायकली असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी नांदोली व शेळोली येथे ४० हजारांची गोवा बनावटीची दारू पकडल्यानंतर भुदरगड पोलिसांनी गावठी दारू अड्ड्याकडे मोर्चा वळवला आहे. आज दुपारी पोलिसांनी देवकेवाडी येथे जंगल परिसरात असणाऱ्या तीन दारू अड्ड्यावर धाड टाकली. हे दारुअड्डे दीपक बाजीराव पोर्लेकर ( वय ३५), विजय एकनाथ येरम (दोघेही रा. देवकेवाडी) या दोघांसह अन्य साथीदार चालवत होते.  या धाडीत ११ हजार १०० लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन जप्त करून नष्ट करणेत आले. प्लास्टिक टाक्या, घागरी, दोन मोटारसायकली असा एकूण ६,९७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.