कोतोली (प्रतिनिधी) : तिरपण (ता. पन्हाळा) येथे नवरात्रीच्या उत्सवानंतर खंडेनवमी व दसऱ्यादिवशी श्री भैरवनाथ यात्रा होत असते. पण यावर्षी उद्भवलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती यात्रा व्यवस्थापन समितीने दिली आहे.
गावातील या यात्रेला विशेष महत्त्व आहे. यावर्षी ही यात्रा रविवार दि. २५ रोजी होणार होती. पण यात्रेमधील गर्दीमुळे कोरोनाचा समूह संसर्ग वाढून रुग्ण संख्या वाढू शकते, हे लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून या यात्रेनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी नवरात्रीचे सर्व विधी घरीच राहून करायचे आहे. गावातील परगावी लग्न करून गेलेल्या मुलींनी देखील देवाला तेल घालणेसाठी यायचे नाही. ग्रामस्थांनी नातेवाइकांना जेवणासाठी आमंत्रित करायचे नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी सोहळा व सोने लुटणे हे कार्यक्रम देखील होणार नाहीत. मात्र देवाची पूजा-अर्चा व सर्व विधी हे देवळाचे पुजारी व बारा बलुतेदार यांच्याकडून होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी गर्दी न करता देवाचे सर्व विधी पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस पाटील, गावातील मानाचे पाटील, यात्रा व्यवस्थापन कमिटी, पुजारी यांचेतर्फे करण्यात आले आहे.