नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इस्रायलमधील ताज्या परिस्थितीची माहिती देत असा रानटीपणा कधीच पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.


“आमच्या शेकडो लोकांची हत्या करण्यात आली, कुटुंबे उद्ध्वस्त झाली, महिलांवर क्रूरपणे बलात्कार आणि हत्या करण्यात आली,” नेतान्याहू बाइडन यांना म्हणाले. त्यांनी डझनभर मुले पळवून नेली, त्यांना बांधून त्यांची हत्या केली. त्यांनी सैनिकांचे शिरच्छेद केले. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावल्याची माहिती आहे.


पंतप्रधान मोदींशीही झाली चर्चा

मंगळवारी नेतान्याहू यांनी त्यांचे भारतीय समकक्ष मोदी यांच्याशीही फोनवर चर्चा केली. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंचे आभार मानले. त्यांनी लिहिले, ‘या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाचा तीव्र निषेध करतो.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या उत्तराबद्दल आभार मानले आहेत. याआधीही पीएम मोदींनी इस्रायलवरील हल्ल्याला ‘दहशतवादी हल्ला’ असे संबोधले होते. इस्रायलशी एकजूट दाखवण्याबाबतही ते बोलले. 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी गट हमासने इस्रायलवर हल्ला केला. नंतर इस्रायलनेही प्रत्युत्तर दिले. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांनी उघडपणे इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत व्हाईट हाऊसकडून संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले आहेत.