कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझा सततचा पाठपुरावा आणि सर्वांच्या सहकार्याने झालेल्या यशाचा आनंद कोल्हापूर विमानतळाबाबत झाला आहे. या संदर्भात दिल्लीत मी वेळोवेळी नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. माझा सततचा पाठपुरावा आणि सर्वांच्या सहकार्यामुळेच कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीचा प्रश्न मार्गी लागत असल्याचा दावा आ. सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी सतत पाठपुरावा सुरू असून यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यासमवेत वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. यामुळे काही महिन्यापूर्वीच कोल्हापूर विमानतळाला ३ सीआयएफआरचा परवाना मिळाला. यासाठी खा. संजय मंडलिक, धैर्यशील माने खा. संभाजीराजे छत्रपती यांच्यासहीत नागरी विमान प्राधिकरण संचालक अरुणकुमार, अरविंद सिंग, अंजू अग्रवाल, उड्डाण योजनेच्या सचिव उषा उपाध्ये, दिनेश शर्मा, मनोजकुमार गर्ग, संजीवकुमार यांच्याबरोबर बैठका घेऊन कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगसह अन्य प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. नाईट लॅँडिगसाठी महावितरणच्या अडथळा करणाऱ्या केबल अंडरग्राउंड करण्यासाठी डीपीडीसीतून १ कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही आ. सतेज पाटील यांनी सांगीतले.

यामुळेच नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीला मान्यता दिली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी कोल्हापूर विमानतळावरून विमानांची ये-जा होणार असल्याचे आ.सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.