मुंबई (प्रतिनिधी) : बहुचर्चित टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर पुढील १२ आठवड्यांसाठी म्हणजे ३ महिन्यांसाठी ‘बार्क’ने (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) टीआरपीवर बंदी आणली आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर बार्कने हा निर्णय घेतला आहे. न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
टीआरपी घोटाळ्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बार्कने आपल्या तांत्रिक समितीला टीआरपी मोजण्याच्या यंत्रणेचे परीक्षण करण्यास सांगितले आहे. ही व्यवस्था सुधरवण्यासाठी किमान १२ दिवसांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत बार्क टीआरपी जारी करणार नाही. सध्या हिंदी, इंग्रजी, प्रादेशिक आणि बिझनेस वृत्तवाहिन्यांना हा निर्णय तत्काळ लागू होणार आहे. त्यात बार्कने पुढील १२ आठवडे टीआरपी जारी न करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे नॅशनल ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने स्वागत केले आहे.
कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी बार्कने एनबीएशी सल्ला घेतला पाहिजे असे मत एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी व्यक्त केले आहे. बार्क (Barc) ही टेलिव्हिजनची प्रेक्षक संख्या मापणारी स्वायत्त संस्था आहे. ही संस्था जगातील एक मोठी संस्था असून २०१० साली या संस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे.